डॅा.उसेंडी यांच्या भाजप प्रवेशासाठी अशा घडल्या नाट्यमय घडामोडी

सकाळी पद, अन् संध्याकाळी पक्षही सोडला

गडचिरोली : गडचिरोलीचे माजी आमदार आणि काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॅा.नामदेव उसेंडी यांनी मंगळवारी सकाळी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी काँग्रेसमध्ये कायम असून मला कोणत्याही पक्षाची आॅफर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. पण संध्याकाळी भाजपच्या नेत्यांनी त्यांना ‘हायजॅक’ करत नागपुरात त्यांचा तडकाफडकी भाजप प्रवेश घडवून आणला. त्यामुळे या सर्व घडामोडी पूर्वनियोजित होत्या, की भाजपने योग्य वेळ पाहून संधी साधली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली नाही म्हणून नाराजी व्यक्त करत डॅा.उसेंडी यांनी आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. असे असले तरी मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नसून आपल्याबाबत पक्षाने योग्य विचार केला नाही तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटवर गडचिरोली विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या डॅा.उसेंडी यांना 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा काँग्रेसने लोकसभेची तिकीट दिली, पण त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळच्या लोकसभेसाठी पुन्हा काँग्रेसकडून तिकीट मिळेल, अशी आशा त्यांना होती.

आ.भांगडियांशी भेट आणि नागपूरसाठी रवाना

दरम्यान भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या नामांकनानिमित्त गडचिरोलीत आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे दूत म्हणून आ.बंटी भांगडिया यांनी डॅा.उसेंडी यांना गाठले. त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या चर्चेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून काही आश्वासने त्यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे डॅा.उसेंडी भाजपमध्ये येण्यास राजी झाले. दरम्यान मोहिम फत्ते होताच नागपूरमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी डॅा.उसेंडी यांना घेऊन रवाना होण्याची सूचना आ.भांगडिया यांना करण्यात आली. अभिनव लॅानमध्ये जाहीर सभेसाठी ना.फडणवीस, बावनकुळे यांचे आगमन होताच आ.भांगडिया आणि डॅा.उसेंडी नागपूरसाठी रवाना झाले. दरम्यान सभा आटोपून उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष हेलिकॅाप्टरने नागपूरमध्ये दाखल झाले आणि संध्याकाळी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांसमोर डॅा.उसेंडी यांचा पक्षप्रवेश केला.