गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्र काबिज करण्यासाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी पदयात्रेतून गावोगावी जनसंपर्क सुरू केला आहे. विश्वजित कोवासे, मनोहर पोरेटी यांच्यासह आता महिला काँग्रेस (आदिवासी सेल)च्या प्रदेशाध्यक्ष उषा धुर्वे यांनीही या पदयात्रेत सहभागी होऊ गावोगावी आणि मार्गातील नागरिकांसोबत संवाद सुरू केला आहे. नागरिकांचा कौल जाणून घेण्यासोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर या यात्रेच्या निमित्ताने भर दिला जात आहे. काँग्रेसच तुमचे हित कसे जोपासू शकते हे पटवून देण्याचा प्रयत्न या यात्रेतून उमेदवार करताना दिसतात.
गडचिरोली विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवार, दि.19 सप्टेंबरपासून ही परिवर्तन यात्रा चपराळा मंदिरातून सुरू करण्यात आली. खासदार डॅा.एन.डी.किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात यात्रेचा शुभारंभ केल्यानंतर ही यात्रा दररोज जवळपास 30 किलोमीटरचे अंतर पायी चालत आहे. यादरम्यान उषा धुर्वे यांनी मार्गातील अनेक गावांमध्ये नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या आणि गावातील प्रश्न जाणून घेतले. एवढेच नाही तर तुम्ही परिवर्तनासाठी सज्ज राहा, तुमच्या समस्या दूर होतील, असा दिलासा दिला.