स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला कलाटणी, ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

अहेरीत करिअर मार्गदर्शन महाशिबिर

अहेरी : केवळ बोर्डाची परीक्षा किंवा पदव्या घेऊन विद्यार्थ्यांचा विकास होत नसतो, तर स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला नवी कलाटणी मिळत असते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी येथील करिअर मार्गदर्शन महाशिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, ज्येष्ठ नेते बबलु हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, रा.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत, माजी प्राचार्य रतन दुर्गे, प्राचार्य मारोती टिपले, प्राचार्य गणपत मेश्राम, नगरसेवक विलास सीडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, स्पर्धा परीक्षेतील यश हे किती नामांकित शाळेत शिकलो यावर अवलंबून नसून केवळ गुणवत्तेवरच आधारित असते. सामान्य वर्गातूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. केवळ दहावी, बारावी, पदवी घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षण नव्हे , तर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून एमपीएससी, युपीएससीचे लक्ष्य गाठणे हेच खरे शिक्षण आहे. यातून जीवनात, कुटुंबात पर्यायाने समाजात एक नवी कलाटणी मिळते. विद्यार्थ्यानी उत्तमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेकडे अधिक लक्ष घालणे काळाची गरज असल्याचे धर्मरावबाबा म्हणाले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देण्यात आले. प्रास्ताविक डॉ.अतुल परशुरामकर यांनी तर सूत्रसंचालन रुपेश कराळे यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व बहुसंख्येने विद्यार्थीगण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी धर्मरावबाबा आत्राम मित्र परिवार आणि नारायणन आय.ए.एस.अकॅडमी नागपूर यांनी परिश्रम घेतले.