गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. धनशक्तीला हरवून जनशक्तीची ताकत दाखवून देण्याकरिता ‘मेरा बुथ सबसे मजबुत’ अभियान राबवा, अशी सूचना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली. गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटीद्वारा आयोजित तालुकास्तरीय बुथ मेळावा व प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
भाजप सरकारने मागील १० वर्षांपासून शेतकरी, महिला, युवकांसह प्रत्येक घटकाचे शोषण करण्याचे काम केले आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करून ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर असा संघर्ष लावून ठेवलेला आहे, अशा सरकारचा चेहरा जनेतेसमोर आणा, असेही ब्राह्मणवाडे म्हणाले.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.