धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट? चौकशी करून गुन्हे दाखल करा

शेतकरी कामगार पक्षाची तक्रारीतून मागणी

गडचिरोली : प्रतीगोणी ४० किलो ६०० ग्रॅम वजनाप्रमाणे धान खरेदी करण्याचे शासनाचे धोरण असताना ओलाव्याच्या नावाखाली ४२ ते ४३ किलोची खरेदी करून जिल्हाभरातील खरेदी केंद्रांवर ८ कोटी रुपयांपेक्षा अधिकची लुट शेतकऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी केली आहे.

शेकापच्या वतीने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यात म्हटल्यानुसार, शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येतो. सध्या आदिवासी विकास महामंडळाच्या ९३ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या २१ अशा साधारणतः ११४ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु आहे.

शासन नियमाप्रमाणे एका गोणी (पोते)मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक धानाची खरेदी करता येत नाही. मात्र जिल्हाभरातील धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी वजनाने धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराबद्दल शेतकरी विचारतात तेव्हा, हे अधिकचे वजन ओलाव्याचे म्हणून घेण्यात येत आहे असे उत्तर दिले जात असल्याचे जराते यांनी सांगितले.

एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनातून शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तुट गृहित धरुन ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रतीगोणी (पोते) वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुध्द लुट असल्याचे जराते यांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १० लाख क्विंटलपेक्षा अधिकची धान खरेदी करण्यात आला असून यातून शेतकऱ्यांची ८ कोटी रुपयांची लूट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

प्रत्येक खरेदी केंद्रांवर खास पथके पाठवून व पोत्यांमध्ये खरेदी केलेल्या धानाच्या वजनाची तपासणी करून या महालुटीची शहानिशा करावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून अधिकच्या खरेदीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, अशीही मागणी जराते यांनी केली आहे.