गडचिरोली : सत्ता परिवर्तन करणे ही आज काळाची गरज आहे. त्यासाठी लोकांना शिक्षित करून चेतना निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गरिब व श्रीमंत यातील दरी वाढत आहे, ही दरी कमी करण्यासाठी समाजवाद हाच लोककल्याण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड अॅड.सुभाष लांडे यांनी केले. भाकपच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या सदस्यांच्या तीन दिवसीय शिक्षण शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॅा.नामदेवराव चव्हाण यांनी केले. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक प्रागतिक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत यांनी लाल आणि निळा झेंडा एकत्र आले तर सत्ता परिवर्तन करता येईल असे म्हटले. ग्रामसभेचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी या सरकारविरोधात लढत असताना मरण पत्करेन पण संघर्ष सोडणार नाही,असे म्हटले. शेकापचे नेते रामदास जराते म्हणाले, आम्ही लाल बावट्याच्या सोबत अन्याय-अत्याचाराविरोधात लोकशाही मार्गाने लढत असलो तरी आमची ओळख नक्षलवादी म्हणून करण्यात येते, ही शोकांतिका आहे. कारण जो-जो लाल सलाम म्हणतो त्याला नक्षलवादी समजले जाते, अशी खंत व्यक्त केली.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष व भाकपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॅा.महेश कोपुलवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, आदिवासींच्या प्रश्नासाठी भाकपसह लाल व निळा झेंड्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आमच्या जिल्ह्यात खाणविरोधात आंदोलन सुरू आहे आणि सर्वांना सोबत घेऊन यापुढे भाजपच्या पराभवासाठी इंडिया व प्रागतिक पक्षांच्या माध्यमातून आपली एकजूट अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
या शिबिराला राज्यभरातील राज्य कौन्सिल सदस्य आले होते. मंचावर भाकपचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे, प्रा.डॅा.राम बाहेती, प्रा.युगल रायलू, कॉ. शाम काळे, कॉ. बबली रावत, कॉ. राजू देसले, कॉ. प्रकाश रेड्डी, राजन क्षीरसागर, अॅड.माधुरी क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन अॅड.कॉ. जगदीश मेश्राम यांनी केले. तत्पूर्वी सर्व पाहुण्यांचे स्वागत जिल्हा सचिव देवराव चवळे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद झोडगे यांनी केले.