वैरागडात पोलिसांच्या पुढाकाराने उभारलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

ग्रंथ हे गुरुसारखे मार्गदर्शक - आ.कृष्णा गजबे

वैरागड : भारतवर्षात गुरुकुल परंपरेने आदर्श पिढी निर्माण केली. चांगले पुस्तक माणसाला नेहमी चांगला विचार देत असतात. पुस्तकांची सोबत म्हणजे चांगल्या विचारांची सोबत होय. म्हणून ग्रंथालय हे गुरुसारखे मार्गदर्शक ठरतात, असे मोलाचे मार्गदर्शन आ.कृष्णा गजबे यांनी केले. आरमोरी पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने आणि वैरागड ग्रामपंचायतच्या वतीने वैरागड येथील ग्राम सचिवालयाच्या सभागृहात शहीद पोलिस कोमल भानारकर यांच्या नावाने पोलिस दादालोरा सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सरपंच संगिता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडने, पोलिस निरीक्षक संदीप मंडलीक, ग्रा.पं. सदस्य आदेश आकरे, छानु मानकर, सत्यदास आत्राम, संगीता मेश्राम, दीपाली ठेंगरे, तंमुस अध्यक्ष पांडुरंग बावनकर, महादेव दुमाने, डोणू कांबळे, बालाजी पोपळी, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, प्रदीप बोडणे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक पोलिस कर्मचारी ठाकरे यांनी केले. संचालन नेताजी बोडणे यांनी तर आभार प्रदर्शन वैरागड बीटचे अंमलदार मुनघाटे यांनी केले. हे सार्वजनिक वाचनालय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सुरू ठेवले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.