काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

जल्लोषात धरला ठेका, पहा झलक

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत विदर्भात मिळालेल्या मोठ्या यशाने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. पूर्व विदर्भात आणि त्यातल्या त्यात गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर हे लोकसभा क्षेत्र राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचे झाले होते. गृहजिल्हा असलेल्या गडचिरोलीतील विजयासाठी त्यांनी रान उठवत वातावरण निर्मिती केली. त्यामुळे डॅा.किरसान यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या ना.वडेट्टीवार यांनी निकालाच्या दिवशीही गडचिरोलीत ठाण मांडले होते. महाविकास आघाडीचा विजय दृष्टिपथास पडताच ते कार्यकर्त्यांसोबत जल्लोषात सहभागी झाले. एवढेच नाही तर ढोल-ताशाच्या तालावर ठेकाही धरला.

पहिल्या फेरीपासून डॅा.किरसान यांनी मतांची आघाडी घेतली. ईव्हीएमच्या एकूण 26 फेऱ्या तर एक पोस्टल मतांची फेरी होती. रात्री 8 वाजताच्या सुमारास अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली, मात्र दुपारीच या निकालाचा अंदाज आला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधीपक्ष विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर आतिषबाजी केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आयटीआय चौकात एकच जल्लोष केला. ढोलताशाच्या गजरात रॅलीही काढण्यात आली. यावेळी आमगाव-देवरीचे आमदार सहेषराम कोरोटी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्य़ेने उपस्थित होते.

लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याच पद्धतीने यश मिळून सत्तापरिवर्तन होईल, असा विश्वास यावेळी ना.वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.