काँग्रेसचे डॅा.नामदेव किरसान यांनी रोखली भाजपचे अशोक नेते यांच्या विजयाची हॅटट्रिक

10 वर्षानंतर परिवर्तन, 'नोटा' चौथ्या स्थानी

गडचिरोली : तब्बल सव्वा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (दि.4) झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातून काँग्रेसचे डॅा.नामदेव किरसान यांनी बाजी मारली आहे. त्यांनी सलग दोन वेळा खासदार राहिलेले भाजपचे अशोक नेते यांचा 1,41,696 मतांनी पराभव केला. डॅा.किरसान यांना 6,17,792 मते, तर अशोक नेते यांना 4,76,096 मते मिळाली. यामुळे या मतदार संघातून हॅटट्रिक करण्याचे नेते यांचे स्वप्न भंगले. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यात डॅा.किरसान यांना यश आले.

सकाळी 8 वाजता कृषी महाविद्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीला संथगतीने सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेमुळे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यास तीन तास लागले. नंतर हळूहळू मतमोजणीला वेग आला. रात्री 8 वाजताच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी विजयाचे प्रमाणपत्र डॅा.नामदेव किरसान यांना दिले.

राज्य उत्पादन शुल्क विभागात सहायक आयुक्त पदावर असताना राजीनामा देऊन राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले डॅा.नामदेव किरसान गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून गडचिरोली-चिमूर क्षेत्रात जनसंपर्क ठेवून होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने संधी दिली नसताना त्यांनी आपला जनसंपर्क कमी न करता आणखी वाढवला. त्याचा बराच फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचे दिसून येते.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास, मार्गदर्शन आणि नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच आपण हा विजय संपादन करू शकलो, असे सांगत त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा मागासलेपणाचा ठप्पा मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया या विजयानंतर दिली.

जनतेच्या सेवेत राहणार- अशोक नेते

10 वर्षांपासून खासदार असलेले अशोक नेते यांनी मतदारांनी दिलेला कौल स्वीकारला. आम्ही केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडल्याची कबुली त्यांनी दिली. निवडणुकीत जय-पराजय होणारच, पण मी जनसेवेची कामे सुरूच ठेवणार आहे. यापूर्वीही निवडणुकीत पराभवाचा सामना मला करावा लागला होता, पण मी थांबलो नाही. यापुढेही मी जनतेच्या सेवेत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चौथ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ला

एकूण 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तिसऱ्या क्रमांकाची मते बसपाचे योगेश गोन्नाडे यांना (19055) तर, चौथ्या क्रमांकाची (16714) मते नोटा, अर्थात रिंगणातील कोणीही उमेदवार पसंत नसण्याच्या पर्यायाला मतदारांनी दिली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी यांना 15922 मते, अपक्ष विनोद मडावी यांना 6126, अपक्ष विलास कोडापे यांना 4402, भीमसेनेचे सुहास कुमरे यांना 2872, अपक्ष करण सयाम यांना 2789, बीआरएसपीचे बारीकराव मडावी यांना 2555, तर जनसेवा गोंडवाना पार्टीचे धीरज शेडमाके यांना सर्वात कमी 2174 मते मिळाली.