गौतमीला नाचवण्यात त्यांचे काय चुकले? तरुणाईच्या मनोरंजनासाठी उधळले लाखो

गौतमी पाटीलच्या अदांनी झाले सारेच घायाळ

(शाल-जोडी / मनोज ताजने)
गडचिरोली : ‘गौतमी पाटील’ हे नाव माहित नाही असा तरुण सध्या राज्यात शोधूनही सापडणार नाही. लावणी नृत्यासोबत आपल्या दिलखेचक अदांनी उभ्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमीचा कार्यक्रम रविवारी गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या फॅन्स क्लबने चामोर्शी येथे ठेवला होता. एरवी तिकीट काढून पहाव्या लागणाऱ्या गौतमीच्या नृत्याला फुकटात पाहण्याची व्यवस्था केल्यामुळे तरुणाईची गर्दी झाली नाही तरच नवल. चामोर्शीच नाही तर गडचिरोलीपासून पंचक्रोशीतील शेकडो शौकिनांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंदही लुटला, पण या कार्यक्रमाची तारीख ठरल्यापासून तर आता प्रत्यक्ष कार्यक्रम झाल्यानंतरही या कार्यक्रमाची चर्चा मात्र थांबता थांबेना झाली आहे. त्या चर्चेचा सूर एकच आहे, तो म्हणजे भाजपसारख्या सुसंस्कृत पक्षाच्या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त वादग्रस्त ठरलेल्या गौतमीचा कार्यक्रम ठेवणे शोभते का?

वास्तविक पाहता असा प्रश्न करणारे लोक मुळात ‘अरसिक’च आहेत असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात गाजत असलेल्या एका लावणी सम्राज्ञीच्या नृत्याचा (सांस्कृतिक कार्यक्रमाचा) आनंद आपल्या मतदार संघातील तमाम तरुणाईला घेता यावा, त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी रसिकताच नाही तर मनही मोठे पाहिजे. पण काही अरसिक लोकांना आमदारांच्या फॅन्स क्लबमधील सदस्यांचे हे मोठे मन दिसलेच नाही. त्यामुळे काही लोकांनी सोशल मीडियावरून गौतमीच्या या कार्यक्रमावर टिकेची झोड उठविली. एवढ्या पैशातून तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तके वाटली असती तर कितीतरी तरुणांचे भले झाले असते, अशीही टिप्पणी केल्या गेली. अहो, स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचल्याने नोकरी लागेलच याची गॅरंटी असते का? पण गौतमीच्या कार्यक्रमातून तरुणाईचे मनोरंजन होण्याची गॅरंटी होती, असा दूरगामी विचार फॅन्स क्लबने केला असावा. त्यामुळे टिकाकारांकडे लक्ष न देता नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आला नाही.

मनोरंजनच करायचे होते तर झाडीपट्टीत नाटकांची कमतरता होती का? मनोरंजनात्मक, समाजप्रबोधनपर अशा हव्या त्या विषयावर नाटक उपलब्ध झाले असते. एवढेच नाही तर झाडीपट्टीतच चांगल्या नृत्यांगणाही आहेत. त्यांचा कार्यक्रम ठेवला असता तर स्थानिक कलावंतांनाही प्रोत्साहन मिळाले असते, गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांची उधळपट्टीही करावी लागली नसती, अशी चर्चा एेकायला मिळाली. पण किती संकुचित विचार करत होते ते लोक. समाजप्रबोधनपर नाटकं पाहण्यासाठी कोणी गर्दी करतो का? त्यातही स्थानिक कलाकारांना घेऊन कार्यक्रम करणे म्हणजे ‘घर की मुर्गी दाल बराबर’ असा विषय होतो. त्याचे महत्व लोकांना वाटत नाही. आमदारांच्या फॅन्स क्लबने लाखो रुपये खर्च करून आपल्या मनोरंजनासाठी गौतमीचा कार्यक्रम ठेवला, हा फिल तरुण वर्गाला आला म्हणजे ते जाम खुश होणार, आणि आमदारांसाठी त्यांची मतंही पक्की होणार. अवघ्या ९-१० महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे, याचे तर काही भान ठेवावे लागेल ना भाऊ, असा विचार करून आयोजकांनी गौतमीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब केले, तर त्यात गैर काहीच नाही.

अनेक वेळा नृत्यातील स्टेप्समुळे वादग्रस्त ठरलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपसारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या आमदाराच्या वाढदिवशी करणे शोभते का, असेही अनेक जण बोलत होते. आता भाजपचे आमदार आहेत म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:चा किंवा आपले मतदार असणाऱ्या तरुणांचा शौक पूर्ण करायचा नाही का? गौतमीचा डान्स म्हणले लावणी नृत्यच आहे ना, ती शृंगारिक आणि घरंदाज लावणी नसली म्हणून काय झाले, तिच्या ठुमक्यांवर आणि अदांवर तरुण वर्ग जास्तच फिदा होतात. यापूर्वी काही ठिकाणी त्या उत्साहाच्या भरात कार्यक्रमात गोंधळही झाला आहे, पण यात आयोजकांचा दोष काय? आणि ही सर्व शक्यता लक्षात घेऊनच स्टेज आणि प्रेक्षक यांच्यात सुरक्षित अंतरही ठेवण्याची तसदी आम्ही घेतली होती, असा युक्तीवाद आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी केला तर त्यांचे म्हणणे बरोबरच ठरेल.

ज्या चामोर्शीत हा कार्यक्रम झाला त्या चामोर्शी तालुक्यात तर सध्या अनेक समस्यांनी नागरिक ग्रस्त आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने खरीपाच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. नुकसानभरपाई निश्चित झालेली नाही. विमा कंपन्यांनी हात वर केले आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करत मनोरंजनासाठी नृत्याच्या कार्यक्रमावर लाखो रुपयांची उधळपट्टी करणे म्हणजे ‘असंवेदनशिलता’ नाही का? अशी चर्चा सध्या चामोर्शी तालुक्यातील लोक करताना दिसतात. पण कोणत्याही समस्या किंवा अवकाळी पावसासाठी आमदार जबाबदार नाहीत, हे त्यांना कोण सांगणार? नैसर्गिक आपत्ती येत-जात राहते. त्यासाठी कार्यक्रम करायचे सोडायचे का? वाढदिवस काय दर महिन्याला येतो का? त्यात हा वाढदिवस निवडणुकीच्या आधीचा शेवटचा वाढदिवस असल्याने तो साजरा करायचा नाही का? त्याला उगीच असंवेदनशिलता म्हणून आमच्या उत्साहावर विरजण घालू नका, असे काही कार्यकर्त्यांनी लोकांना सुनावलेही म्हणे.

काही रसिक प्रेक्षक गौतमीला जवळून पाहण्यासाठी आसुसले होते. गर्दीमुळे आणि पोलिसांच्या बंदोबस्तामुळे त्यांची ही ईच्छा अपुरी राहिली. आता आयोजकांनी पुढच्या वेळी आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी गौतमीचा कार्यक्रम एक नाही तर किमान तीन दिवस ठेवावा, म्हणजे ज्यांना पहिल्या दिवशी संधी मिळाली नाही त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तरी गौतमीचा डान्स जवळून पाहता येईल, अशी अपेक्षा युवा वर्गाकडून केली जात आहे. रसिकांची ही ईच्छा आमदारांचा फॅन्स क्लब पूर्ण करेल, अशी आशा ठेवुया.