राष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त विविध क्षेत्रातील दिडशे लोकांचा सन्मान

सत्कारामुळे काम करण्याची प्रेरणा- ना.आत्राम

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून गडचिरोलीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्या १५० व्यक्तींचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्यघटनेने आपल्याला दिलेले अधिकार कोणीही हिरावू शकत नाही, असे सांगत समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याने त्यांच्यासोबत इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.दीपक आत्राम, पद्मश्री परशुराम खुणे यांच्यासह राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी सभापती नाना नाकाडे, विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष (आरमोरी क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.अशोक नेते म्हणाले, मानवाधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यादींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाही. प्रणय खुणे मला नेहमी या मानवाधिकारासंबंधी बोलायचे, परंतु आज गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, आकांक्षित, अविकसित जिल्ह्यात त्यांच्या प्रयत्नाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान झाला. त्यामुळे त्यांचा काम करण्याचा उत्साह आणखी वाढेल. एक चांगला कार्यक्रम खुणे यांनी घडवून आणला. व्यवसायाने ते आता कंत्राटदार असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी नेहमी तत्पर राहतात. त्यांच्या हातून प्रभावीपणे चांगले काम घडावे, अशा शुभेच्छा खासदार नेते यांनी आपल्या मनोगतातून दिल्या.

प्रास्ताविकातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी संघटनेची भूमिका मांडली. काही लोक संघटनेच्या नावाचा गैरवापर करतात. त्यामुळे संघटना बदनाम होते. पण या संघटनेच्या बाबतीत असे होणार नाही, असा विश्वास देऊन संघटनेच्या माध्यमातून लोकांसाठी चांगली कामे केली जाणार असल्याचे सांगितले.

राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि शासकीय सेवेतील उल्लेखनिय व्यक्तींच्या या सत्कार सोहळ्यासाठी गोंडवाना कलादालन भरगच्च भरले होते. कार्यक्रमाचे संचालन गोंडवाना सैनिकी स्कूलचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, विदर्भ महिला अध्यक्ष पायल कापसे, विदर्भ सचिव अनिल गुरनुले, विदर्भ संघटन प्रमुख राम लांजेवार, राहुल झोडे तसेच संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.