अहेरी : गेल्या ४० वर्षापेक्षा अधिक काळापासून राजकीय जीवनात वावरणाऱ्या आणि कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा होत असलेला ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा अभिष्टचिंतन सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अहेरी येथील स्नेहा लॅानमध्ये संध्याकाळी होणाऱ्या या सोहळ्यात ७ हजार लोक बसू शकतील असा भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागाचे राजकीय केंद्र असलेल्या राजनगरी अहेरी येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी धर्मरावबाबा यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नागरिकांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात टिव्हीवरच्या हास्य मालिकांमधील दिग्गज कलावंत खळखळून हसविणार आहेत. एवढेच नाही तर प्रसिद्ध नृत्यांगणांच्या नृत्यांचे सादरीकरणही होणार आहे.
या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, सागर कारंडे, कमलाकर सातपुते, अंशिका चोणकर, तेजा देवकर, हेमलता बाणे, डॅा.सुधीर निकम, चैताली जावध आदी टीव्ही कलावंत प्रत्यक्षात अहेरीकरांसमोर आपली कला सादर करतील.
राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा यावर्षीचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काही सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध टिव्ही कलावंतांच्या हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा आणि नृत्यांच्या नजराण्याचा नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.