कंत्राटीकरणाच्या विरोधात गडचिरोलीत जिल्हा काँग्रेसने केले धरणे आंदोलन

बेरोजगार युवकांचे भविष्य धोक्यात आणल्याचा आरोप

गडचिरोली : भाजप सरकारच्या खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या सपाट्यामुळे स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत गडचिरोलीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. खाजगीकरणाच्या नावाखाली जि.प.च्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. गोरगरीब आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न करत काँग्रेसने यावेळी निषेध नोंदविला. या आंदोलनात काही शिक्षक आणि बेरोजगार तरुणही सहभागी झाले होते.

यावेळी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, यांच्या नेतृत्वातील या धरणे आंदोलनात प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यकक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुकाध्यक्ष परसराम पदा, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ग्राहक सेलचे अध्यक्ष भारत येरमे, शिक्षक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष दिवाकर निसार, आदिवासी सेलचे अध्यक्ष छगन शेडमाके, बंगाली सेलचे अध्यक्ष बिजन सरदार, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, विनोद लेनगुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.