धर्मरावबाबा म्हणाले, मुलगी-पुतण्याने पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे

जिल्ह्यातील नेत्यांचे मूळ गावी मतदान

गडचिरोली : जिल्ह्यातील नेतेमंडळींनी आपल्या मुळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा अहेरी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी वडलापेठ येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

मुलगी भाग्यश्री आत्राम आणि पुतण्या अम्ब्रिशराव आत्राम यांच्यामुळे ही लढत तिहेरी झाली. पण त्या दोघांनीही पुढच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागावे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणत धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी आपणच जिंकणार असे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले.

खासदार डॅा.किरसान यांचे सहकुटुंब मतदान

गडचिरोली-चिमूरचे खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी गोंदिया जिल्ह्यातल्या मूळ गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आवर्जुन मतदान करावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

माजी खासदार अशोक नेते यांनी गडचिरोलीच्या सायन्स कॅालेज केंद्रावर जाऊन पत्नी, मुलीसह मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय आ.कृष्णा गजबे आणि आ.डॅा.देवराव होळी यांनीही आपल्या मूळ गावी सहकुटुंब मतदान केले.