गडचिरोली : अखेर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॅा.नामदेव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत रात्री उशिरा त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. येत्या बुधवार, दि.२७ रोजी अभिनव लॅान येथून वाजतगाजत रॅलीसह जाऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.
अधिकारी ते लोकसभेचे उमेदवार
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले डॅा.नामदेव किरसान हे गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. काँग्रेसचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष म्हणूनही काही दिवस त्यांनी जबाबदारी सांभाळली. सध्या ते प्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
गडचिरोली-चिमूर लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी ते गेल्या सहा वर्षांपासून करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मात्र त्यानंतरही त्यांनी मतदार संघात सतत जनसंपर्क ठेवत आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या वतीने स्थानिक प्रश्नांवर वेळोवेळी झालेल्या आंदोलनांमध्येही ते आघाडीवर राहात होते. त्यांच्या या सक्रियतेने आणि सर्वांशी जुळवून घेण्याच्या कार्यपद्धतीने त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. आता या संधीचे सोने करण्यात ते यशस्वी होतात का, हे निवडणूक निकालानंतरच दिसून येईल.