निवडणुकीसाठी वाहनांमधून दारू, पैसे, स्फोटकांची तर वाहतूक होत नाही ना?

नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी सुरू

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देण्यासाठी दारू, पैशाची वाहतूक किंवा घातपाती कारवाया करण्यासाठी स्फोटकं, घातक साहित्याची तर वाहतूक होत नाही ना, याची कसून तपासणी सुरू आहे. ठिकठिकाणी उभारलेल्या अस्थायी नाक्यांवर आणि विशेषत: तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर प्रत्येक चारचाकी वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

गडचिरोली-चिमूर मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान असल्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेतून दारूचा पुरवठा किंवा पैशाची देवाणघेवाण तर होत नाही ना, याची तपासणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. त्यासाठी सिरोंचा, अहेरी तसेच भामरागड, धानोरा, कोरची तालुक्यात नाके उभारण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे घातपात घडविण्यासाठी काही संशयास्पद वस्तू आढळते का याचीही तपासणी केली जात आहे.

जप्त रकमेसंदर्भात तक्रार निवारण समिती गठीत

निवडणूक काळात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तु जप्त करणे किंवा सोडणे यासाठी मानद कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान पोलिस विभागाकडे एफआयआर किंवा तक्रार दाखल न करता कोषागारामध्ये रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तु ठेवल्या जातात. प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे, छाननी / पडताळणी करणे इत्यादी कामांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी जिल्हास्तरावर जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे अध्यक्ष असून निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जिल्हा कोषागार अधिकारी हे सदस्य आहेत. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम सोडणे / सुपूर्द करणे याबाबत निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी यांनी निर्देशांचे तंतोतंत पालन करून अभिलेखाचे जतन करावे. निवडणूक काळामध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तरतुदीनुसार कार्य करण्याचे आदेशात नमुद आहे.