‘४०० पार’चा संकल्प करत आरमोरीत नेते यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

विकासात्मक दृष्टिसाठी साथ द्या- पोरेड्डीवार

आरमोरी : लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – आरपीआय – पिरिपा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आरमोरी येथे मंगळवार, दि.2 एप्रिलला ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. जुन्या बस स्थानकाजवळ उद्घाटन झाल्यानंतर सावकारांच्या वाड्यात पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची छोटेखानी सभा झाली.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना अरविंद सावकार म्हणाले, कार्यकर्तृत्ववान, विकासात्मक दृष्टि असलेले पंतप्रधान लाभले याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने मोठी होते. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्याचे काम चालू असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विकासात्मक दृष्टि असणाऱ्या या सरकारला पुन्हा साथ द्या, विजय आपलाच आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुल देशकर, लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे, गडचिरोली नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे यांच्यासह तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, नंदू काबरा, जिल्हा सचिव नंदू पेठ्ठेवार, पवन नारनवरे, नंदु कलंत्री, गणपत सोनकुसरे, ईश्वर पासेवार, भारत बावनथडे, संगिता रेवतकर, रोशनी पारधी, मिनाक्षी गेडाम, ॲड.उमेश वालदे, सागर निरंकारी, वसंत दोनाडकर, योगेश नाकतोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.नेते म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी जागतिक स्तरावर आपली छाप पाडली आहे. मी केंद्र सरकारकडून अनेक विकास कामे खेचून आणली आहेत. त्यात प्रामुख्याने रेल्वेचा प्रश्न असेल, सिंचन प्रकल्प, रस्त्यांचे प्रश्न असतील, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प अशी अनेक कामे मंजूर करून आणण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. नवीन रेल्वेमार्गासाठी सर्व्हेचे कामही मंजूर केले आहे. जे काम साठ वर्षात काँग्रेस सरकारने केले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या १० वर्षात करून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. विकासाच्या गॅरंटीसाठी पुन्हा कमळ फुलवा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

आ.कृष्णा गजबे, लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुल देशकर, लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.