महिनाभरात पोलिस, एक्साईज विभागाने पकडली १.६३ कोटी रुपयांची दारू

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ८८ पथके

गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अंमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत दारू, अंमली पदार्थ व इतर मौल्यवान ऐवज जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत 1 कोटी 63 लाख 45 हजार रुपये इतकी आहे.

जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिस विभागामार्फत 46 हजार 318 लिटर दारू व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 3 हजार 975 लिटर अशी एकूण 50 हजार 293 लिटर दारू जप्त करण्यात आली. त्याची किंमत 79 लाख 94 हजार रुपये आहे. तसेच 83 लाख 50 हजार किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीवरही पोलिसांची बारीक लक्ष असून या कारवाईत 93 ग्रॅम तंबाखुजन्य अंमली पदार्थ जप्त केले आहे.

जिल्ह्यात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी 42 तर लोकसभा मतदार संघात 88 पथके नेमण्यात आली आहेत. यात व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी) 29, भरारी पथक (एफएसटी) 24, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) 29 आणि 6 श्राव्य पथक(एटी) पथकांचा समावेश आहे. याशिवाय माध्यम सनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष यांचेमार्फतही निवडणूक गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कालावधीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरण्यात येणारी रोख रक्कम, मद्य आणि अन्य प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबतच्या घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, जाहिरातींचे पुर्वप्रमाणिकरण करणे, नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करणे आदी कामे या पथकांच्या माध्यमातून केली जात आहे.

याशिवाय आचारसंहिता भंगाबाबत सि-व्हीजिल ॲपवर एक तक्रार नोंदविण्यात आली आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलिस स्टेशनला एका अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांतच कारवाई केली जात असल्याने, निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सी-व्हिजिल ॲपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.