विजेच्या प्रश्नावर खा.अशोक नेते यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा

देसाईगंजमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

देसाईगंज : शेतातील उन्हाळी पिकांना वाचविण्यासाठी कृषीपंपाला दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी दि.२६ फेब्रुवारीपासून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. सहाव्या दिवशीही श्याम मस्के यांचे आमरण तर इतर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच आहे. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी संध्याकाळी उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईलवर संपर्क करून शेतकऱ्यांची व्यथा त्यांना सांगितली.

काही तांत्रिक कारणांमुळे १२ तासांचा वीज पुरवठा देण्यास महावितरण कंपनीला अडचणी येत आहेत. मात्र यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा बरेच दिवस देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपांना ८ तासांचा वीज पुरवठा केला जात होता. पण ना.फडणवीस यांनी या भागातील जंगली प्राण्यांची समस्या लक्षात घेऊन रात्रीऐवजी दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्याची सूचना वीज कंपनीला केली होती. त्यानंतर काही दिवस १२ तास वीज मिळालीसुद्धा, पण अलिकडे वीज पुरवठा पुन्हा १२ वरून ८ तास करणे सुरू झाले.

कृषीपंपांना दिवसा अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील पिकांना पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यभरात वाढलेली विजेची मागणी आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे सध्या दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्यास महावितरण कंपनीने असमर्थता दर्शवली असली तरी यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन ना.देवेंद्र फडणवीस यांनी खा.नेते यांच्याशी मोबाईलवर बोलताना दिले.

यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, वसंत दोनाडकर, प्रमोद झिलपे, श्याम मस्के, गोपाल उईके, मोहन गायकवाड, रमेश अधिकारी, दुश्यंत वाटगुरे, राम मेश्राम, विलास बन्सोड तसेच मोठया संख्येने शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

अधिकारी आल्या पावली परतले

तालुक्यातील शेतकऱ्यांनी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून धडक दिल्यानंतर शेतकऱ्यांना मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाची सुरुवात कोरेगांवचे शेतकरी श्याम मस्के पाटील यांनी केली. दोन दिवसांपूर्वी वीज कंपनीचे उपविभागीय अभियंता अमर लिखार व नायब तहसीलदार बोडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पण या अधिकाऱ्यांची चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका श्यामराव मस्के व शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांना आल्या पावली परतावे लागले.