गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी शांततेत झालेल्या मतदानाने प्रशासकीय यंत्रणेसह पोलिस विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला, पण आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांनाही कोण निवडून येणार, कोणत्या भागात कोणाला जास्त मतदान पडले, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे एकमेकांना ‘भाऊ, कोण चाललं तुमच्या भागात, पंजा की कमळ?’ असे आवर्जुन विचारले जात असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात एकूण 71.88 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात आमगाव विधानसभा मतदारसंघात 69.25 टक्के, आरमोरी 73.69 टक्के, गडचिरोली 71.42 टक्के, ब्रम्हपुरी 75.10 टक्के, चिमुर 74.41 टक्के, तर सर्वात कमी 66.90 टक्के एवढे मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात झाले आहे.
आरमोरी, चिमूर, गडचिरोली आणि अहेरी या मतदार संघांमध्ये भाजप आघाडी घेईल असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात होता. पण येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता तो कुठे भाजप तर कुठे काँग्रेस आघाडी घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रह्मपुरी आणि आमगाव या मतदार संघात मात्र काँग्रेस पुढाकार घेईल असे ठामपणे सांगितले जात आहे. यामुळे बसपा, वंचित, बीआरएसपी प्रभावी नसल्यामुळे काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत झाली. त्यामुळे पंजा की कमळ एवढेच जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पण त्यासाठी 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या लोकसभा मतदारसंघात 16 लक्ष 17 हजार 702 मतदार आहेत. यात 8 लक्ष 14 हजार 763 पुरुष मतदार, 8 लक्ष 2 हजार 434 स्त्री मतदार, तर 10 इतर मतदार आहेत. यापैकी 5 लक्ष 95 हजार 272 पुरुष मतदारांनी (73.06 टक्के), 5 लक्ष 67 हजार 157 स्त्री मतदारांनी (70.68 टक्के), तर 5 इतर नागरिक असे 11 लक्ष 62 हजार 434 (71.88 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.