गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका नक्षल सहकाऱ्याला (जनमिलिशिया) गडचिरोली पोलिसांनी अटक केली. भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी भामरागड गावात फिरताना त्याला अटक केली. दिलीप मोतीराम पेंदाम (34 वर्ष) असे त्याचे नाव असून तो नेलगुंडा येथील रहिवासी आहे.
नेलगुंडाच्या जंगल परिसरात गेल्यावर्षी (दि.22 मार्च 2023) एक क्लेमोर व दोन कुकर बॅाम्ब पेरून सुरक्षा दलाच्या जवानांना जीवे मारून त्यांची शस्रास्र व दारूगोळा लुटण्याच्या कटात तो सहभागी होता. त्याच्यावर शासनाने दीड लाखाचे बक्षीस ठेवले होते.
दिलीप पेंदाम याच्याविरूद्ध लाहेरी येथे भादंवि कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120(ब) भादंवि, सहकलम 4, 5 भारतीय स्फोटक कायद्याच्या वाढीव कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
अधिक तपासातात त्याने या आधीसुद्धा अनेक कारवायांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, तसेच रेशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन पोलिसांविरुध्द कट रचने, नक्षल सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत असल्याचे आढळून आले.
पोलिस दलाच्या या कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांना हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.