अहेरी : गेल्या ५ नोव्हेंबरला मतदान झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ७ रोजी जाहीर झाला. प्रत्यक्षात मतदान होत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती अहेरी विधानसभा मतदार संघातील होत्या. त्यामुळे आपापले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली. यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या मेहनतीला सर्वाधिक यश लाभले. या भागातील नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वाला दिलेला हा कौल आहे का? असा प्रश्न या निमित्ताने चर्चेचा विषय झाला आहे.
एरवी बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपले पिता ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत उपस्थिती लावणाऱ्या भाग्यश्रीताईंनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने एकटीने किल्ला लढवला. गावागावात प्रचार करण्यासाठी जबाबदारी घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध केले.
मोजक्याच गावांमध्ये ही निवडणूक झाली असली तरी त्यानिमित्ताने कोणाची किती ताकद आहे हे सिद्ध करण्याची वेळ होती. त्यामुळे अहेरी विधानसभेतील ४ तालुक्यात सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम आणि आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रचार केला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार याची कल्पना सर्वांनाच होती. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी विद्यार्थी संघ यांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पण यात सर्वाधिक कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळाला.
५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या एटापल्ली तालुक्यातील जांबिया, हालेवारा आणि नागुलवाडी या तिन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून आले. त्यात अनुक्रमे गीता किशोर हिचामी, नीलिमा संतोष गोटा आणि नेवलू बंडू गावडे यांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यात टेकला, आरेवाडा, मडवेली, इरकडुमे, पल्ली आणि बोटनफुंडी अशा सहा ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूक झाली. यात टेकला, बोटनफुंडी आणि पल्ली या तीन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच अनुक्रमे काजल मधुकर धुर्वा, दुलसा नवलू मडावी, मनोज डिंगा पोरतेट निवडून आले. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने तालुकाध्यक्ष म्हणून रमेश मारगोनवार यांच्या खांद्यावर दिलेली धुरा त्यांनी व्यवस्थित सांभाळल्याचे दिसून आले.
अहेरी तालुक्यात राजाराम (खां) आणि व्यंकटापूर या दोन ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष निवडणूक झाली. यात राजाराम ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच मंगला खुशाबराव आत्राम निवडून आले. सिरोंचा तालुक्यात कोटापल्ली ग्रामपंचायतची निवडणूक झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानी गणेश आत्राम सरपंचपदी निवडून आले. अश्या प्रकारे प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या अहेरी मतदार संघातील 12 ग्रामपंचायतींपैकी 8 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले.
जनतेचा विकासावर विश्वास : भाग्यश्री आत्राम
पहिल्यांदाच प्रचाराची धुरा मी स्वतः सांभाळली आणि त्यात मिळालेले यश समाधान देणारे आहे. विशेष म्हणजे केवळ निवडणुका आहेत म्हणूनच जनतेत न जाता बाराही महिने मी जनतेत असते. सर्वसाधारण लोकांशी माझा रोजचा संपर्क आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विकास कामांवर जनतेचा विश्वास असल्यानेच ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला हे यश मिळाले आहे. आमच्यावर विश्वास ठेवून खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मतदारांचे कार्यकर्त्यांचे मी आभार मानते, अशी भावना या निकालानंतर भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केली.