काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाने आरमोरीकरांचे लक्ष वेधले, तहसीलदारांना निवेदन

वीज पुरवठ्यासह इतर मागण्यांचे निवेदन

आरमोरी : आरमोरी हा प्रगतशील तालुका असला तरी तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व वर्गाच्या विविध समस्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. ढोलताशा आणि दिंडीच्या गजरात काढलेल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा प्रभारी नामदेवराव किरसान यांच्यासह आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे भारनियमन बंद करुन ८ तासावरून १६ तास वीज पुरवठा करण्यात यावा, डोंगरगाव ठाणेगाव उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांच्या शेत व पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावे, तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी विशेष पिक विमा लागू करावा, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. हा मोर्चा तहसील कार्यालयात धडकताच या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी तहसीलदार श्रीहरी माने यांचेकडे निवेदन देण्यात आले.

मोर्चात माजी आ.आनंदराव गेडाम, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, प्रदेश सचिव नितीन कोडवते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नरोटे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.