अहेरी : स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या समारोपीय टप्प्यात भाजपातर्फे “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत अहेरी तालुक्यात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे जन्मस्थळ किष्टापूर (दोडगेर) येथील निवासस्थळ असलेल्या पवित्र भूमीचे विधीवत पुजन करण्यात आले. तेथील माती तसेच सभामंडपाच्या ठिकाणची माती अमृत कलशात गोळा करण्यात आली. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचा प्रमुख उपस्थितीत वाजतगाजत अमृत कलश यात्रेची सुरुवात करण्यात आली.
गावातील आबालवृध्दांसह सामान्य नागरिक या अमृत कलश यात्रेत मोठ्या ऊत्साहाने सहभागी झाले होते. यात्रेमुळे गावात उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले. वीर बाबुराव शेडमाकेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत यात्रा पुढे निघाली. जिम्मलगट्टा, गुंडेरा, रेपनपल्ली, कमलापूर, छल्लेवाडा, राजाराम, खांदला, रायगट्टा, गोलाकर्जी, तिमरम, गुड्डीगुडम, आलापल्ली, नागेपल्ली इत्यादी सर्व गावांत यात्रेचे जोरदार स्वागत झाले. तसेच अमृत कलशाचे पूजनही केले.
ठिकठिकाणी शाळकरी मुलांनी रॅलीद्वारे यात्रेत सहभाग घेतला. दरम्यान मार्गावरील सर्वच गावातील अमृत कलश संकलित करण्यात आले. दिल्ली येथील कर्तव्यपथावर निर्माण होत असलेल्या अमृतवाटीकेसाठी सर्व अमृत कलश पाठविण्यात येतील. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री यांनी केले होते.
यावेळी प्रशांत कुत्तरमारे, संतोष मद्दीवार, अमोल गुडेल्लीवार, गुड्डू ठाकरे, विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, विकास उईके, मुकेश नामेवार, प्रशांत नामनवार, अक्षय संतोषवार, सारंग रामगिरी, प्राजक्ता पेदापल्लीवार, हर्षा ठाकरे, शालिनी पोहणेकर, विजया विठ्ठलानी, रहीमा सिद्धीकी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.