गडचिरोली : तिसऱ्यांदा पक्षाचे तिकीट मिळून आमदारकीची हॅटट्रिक करण्याचा विचार करणाऱ्या डॅा.देवराव होळी यांनी गाजावाजा करत आधीच नामांकन दाखल केले. पण भाजपने त्यांना डावलून डॅा.मिलिंद नरोटेंना पसंती दिली. यामुळे आता निवडणुकीतून माघार घ्यायची, की बंडखोरी करत अपक्ष लढायचे याचा निर्णय डॅा.होळी आज घेणार आहे.
दरम्यान डॅा.होळी यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाने उमेदवारीसंदर्भात पुनर्विचार करावा, असे म्हणत शेवटची गळ घातली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कोणता निर्णय घ्यायचा, यासंदर्भात आज निर्णय घेतला जाणार आहे. डॅा.होळी रविवारी मुंबईत होते. आज ते परत आल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत. अपक्ष लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे. पण महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॅा.मिलिंद नरोटे राहणार असल्याने कालपर्यंत डॅा.होळी यांच्यासोबत दिसणारे महायुतीमधील अनेक पदाधिकारी आता अधिकृतपणे त्यांच्यासोबत दिसणार नाहीत.