गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात यावेळी काँग्रेसकडून लढणाऱ्या ईच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असा विचार करून अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याची तयारी चालवली आहे.
अहेरी विधानसभेसाठी काँग्रेसने आधीपासून तयारी सुरू केली होती. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे नेटवर्क आणि स्वत:ची सक्रियता यावर आपल्याला कौल मिळेल अशी आशा हनमंतू मडावी यांना होती. पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)च्या कोट्यात गेल्याने मडावी यांच्यासह काँग्रेसमधील इतरी इच्छुकांची गोची झाली आहे. त्यामुळे हनमंतू मडावी अपक्ष नामांकन दाखल करण्याच्या तयारीत आहे.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात विश्वजित कोवासे आणि मनोहर पोरेटी या प्रबळ दावेदारांपैकी पक्षाने पोरेटी यांची निवड केली. पण प्रत्यक्षात उमेदवारीच्या स्पर्धेत नसलेल्या पण तिकीट आपल्यालाच मिळेल या हवेत असलेल्या डॅा.सोनल कोवे यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी, अनुभव नसला तरी आर्थिक ताकदीच्या जोरावर आपणच आमदार होऊ, अशी भाबडी आशा त्यांना आहे. त्यामुळे डॅा.कोवे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरमोरी मतदार संघात पेशाने शिक्षक असलेल्या रामदास मसराम यांच्यावर काँग्रेसने डाव लावला आहे. मसराम हे पक्षात थेट सक्रिय नव्हते. मात्र अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्यांना डावलून सक्रिय नसणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत नाराज झाले आहेत. त्यातून माजी आमदार आनंदराव गेडाम, वामनराव सावसाकडे किंवा इतर इच्छुकांमधून कोणी अपक्ष नामांकन भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.