गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी महायुतीचा महामेळावा घेत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मिरवणुकीसह जाऊन नामांकन दाखल केले. दरम्यान पक्षाकडून मलाच तिकीट मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मला पुन्हा एकदा सेवेची संधी द्या, असे आवाहन केले.
गेल्या 10 वर्षापासून मी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक कामे झाली आहे, परंतु अजूनही मागास असलेल्या या जिल्ह्याचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनतेने मला पुन्हा सेवेची संधी द्यावी आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी या महामेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सहसंपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, बंगाली आघाडीचे दीपक हलदर, प्रशांत भृगुवार, विलास दशमुखे, मारोतराव इचोडकर, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार, प्रतिभा चौधरी, कविता ऊरकुडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मेळाव्यानंतर ढोलताशांच्या गजरात आदिवासी नृत्य व बैलबंड्यांसह मिरवणूक काढून आमदार डॅा.देवराव होळी यांनी आपले नामांकन दाखल केले.