गडचिरोली : जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले असले तरी काँग्रेसचे उमेदवारीचे गणित अजूनही जुळताना दिसत नाही. तयारीसाठी एक-एक दिवस महत्वाचा असताना उमेदवारी जाहीर करण्यासाठी लागणारा हा विलंब उमेदवारासाठी मारक ठरू शकतो. दरम्यान गडचिरोलीसह आरमोरी आणि अहेरीतही काँग्रेस अधिकृत उमेदवार जाहीर करून मैत्रीपूर्ण लढत देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत तीनही विधानसभा क्षेत्रातून आघाडी घेणाऱ्या काँग्रेसला विधानसभेसाठी उमेदवार निवडताना इतका उशिर का लागत आहे याचे अनेकांना कोडे पडले आहे. किमान ज्या ठिकाणी मित्रपक्षांचा दावा नाही अशा गडचिरोली विधानसभेत तरी उमेदवारी लवकर जाहीर होईल असे अपेक्षित असताना काँग्रेसला नेमकी कशाची प्रतीक्षा आहे, अशी चर्चा केली जात आहे.
अहेरी मतदार संघासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. या ठिकाणी हनुमंतू मडावी हे काँग्रेसच्या तिकीटसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यांची चांगली प्रतिमा आणि जनसंपर्क या जोरावर त्यांना या भागात चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला सहकार्य करण्याऐवजी स्वतंत्रपणे रिंगणात उतरून मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरमोरीत पहिला उमेदवारी अर्ज दाखल
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यात दोन अर्ज दाखल झाले. त्यात गडचिरोलीत डॅा.देवराव होळी (भाजप) यांनी सलग दुसऱ्या दिवशी अर्ज दाखल केला. तर आरमोरी क्षेत्रात रामदास मळूजी मसराम (काँग्रेस) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील हा पहिलाच अर्ज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच उमेदवारांकडून सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. मंगळवार, दि.29 ही नामांकनासाठी शेवटची तारीख आहे.