गडचिरोली : राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याची घोषणा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार ते शुक्रवारी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहावर पक्षाचे निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना होतील.
या धावत्या भेटीत राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासोबत संभावित उमेदवारांची चाचपणीही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी अवघे दोन ते तीन महिने शिल्लक असताना गडचिरोली जिल्ह्यात मनसेची ओळख निर्माण करण्याची आणि संभाव्य उमेदवार शोधण्याची कसरत ते कसे करतात, त्यासाठी कोणती ‘जादु की झप्पी’ देतात, याकडे गडचिरोलीवासियांचे लक्ष राहणार आहे.