गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर खासदार नेते यांची पंतप्रधानांसोबत चर्चा

सिंचन प्रकल्पांसह कोनसरीतील लोहप्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना खासदार अशोक नेते.

गडचिरोली : देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मार्गी लागलेली कामे आणि प्रलंबित कामांबद्दल शुक्रवारी खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली. यावेळी जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या सुरजागड, कोनसरी येथील लोहप्रकल्पाचे आणि चिचडोह बॅरेजचे उद्घाटन करण्यासाठी आणि प्रस्तावित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण खा.नेते यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

भाजपच्या जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार म्हणून नेते यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करताना आपल्या क्षेत्रात झालेल्या कामांची माहिती दिली. तसेच प्रस्तावित गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी, तसेच छत्तीसगड आणि तेलंगणाला रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी पुढील प्रक्रिया मार्गी लावण्याकडे जातीने लक्ष देऊन संबंधितांना निर्देश देण्याची मागणी यावेळी खा.नेते यांनी केली.

यासोबत उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीवर, तसेच वनांवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी या जिल्ह्यात उद्योगांना विशेष सवलती देण्याची आग्रही मागणी खा.नेते यांनी केली. याशिवाय लोकसभा क्षेत्रातील इतरही प्रश्नांबाबत त्यांनी पंतप्रधानांना निवेदन दिले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा मागासलेपणाचा ठप्पा मिटवून या क्षेत्राला विकासाकडे वेगाने नेण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास खा.नेते यांना दिला.