गडचिरोली : गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आपल्या लोकसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी सरकारकडे केली असून हे पॅकेज मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती त्यांनी खा.राहुल गांधी यांना केली. त्यावर सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र महाराष्ट्रातील लोकसभा क्षेत्रांपैकी अतिमागास क्षेत्र असून दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो, शेतीचेही अतोनात नुकसान होते. लोकसभा क्षेत्रात मोठे उद्योग नसल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारीचीही समस्या वाढत असल्याची माहिती खा.किरसान यांनी दिली. त्यामुळे विशेष आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव तयार करून सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.