मुलचेरा : गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांसाठी शासन कटिबद्ध राहून पाहिजे तितका निधी दिला जात आहे. मात्र काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकास कामांना गती मिळत नसल्याचे दर्शनास येत आहे. कामातील ही दिरंगाई खपवून घेणार नाही, अशा शब्दात राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलचेरा येथील तालुकास्तरीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना तंबी दिली.
विशेष म्हणजे आधीच रस्त्यांच्या दुरावस्थेचा विषय तापलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (क्र.2) कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी बैठकीला दांडी मारली. रस्त्यांचा विषय निघाल्यानंतर साखरवाडे अनुपस्थित असल्याचे पाहून धर्मरावबाबा यांनी बैठकीतूनच अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्याशी संपर्क करून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर जिल्हाधिकारी संजय दैने यांना अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सुरुवातीला त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची, तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत माहिती घेतली. त्यानंतर आरोग्य, शिक्षण, वन विभाग, महसूल, वीज वितरण, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सिंचन विभाग आदी विभागांचा आढावा घेऊन सर्वसामान्यांना वेठीस धरल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
यावेळी तहसीलदार चेतन पाटील, गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, पेडिगुडमच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने, ठाणेदार अशोक भापकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, राकाँचे प्रदेश सचिव युनूस शेख, जि.प.चे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार आदी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवलेच नाही
विशेष म्हणजे मागील एक ते दीड वर्षापासून मुलचेरा ते आल्लापल्ली या रस्त्याची चाळण झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे भरणे आवश्यक होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत आढावा सभेत विषय निघाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (क्र.2) कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे गैरहजर होते. त्यांनी मंत्र्यांच्या सभेला महत्व न देता शाखा अभियंत्याला पाठवले होते. विशेष म्हणजे 2 आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयातील अहेरी विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता साखरवाडे यांची खरडपट्टी काढत खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देश दिले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आणि सभेलाही गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री धर्मरावबाबा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे निर्देश दिले.