देसाईगंज : ओबीसीची चादर ओढून दोन वेळा पंतप्रधानपद मिळवणारे नरेंद्र मोदी हे ओबीसींच्या जनगणनेला मात्र विरोध करतात. त्यामुळे ते ओबीसी नसून खऱ्या अर्थाने बनियाच आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देसाईगंजजवळील कोंढाळा येथे आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी पटोले म्हणाले, जातनिहाय जनगणनेअभावी निती आयोगाला आर्थिक धोरण ठरवणे कठीण होते. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाची किती लोकसंख्या आहे हे कळणार नाही. यातून सर्व मागासवर्गीयांच्या योजना बंद होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ईव्हीएममध्ये गडबड आहे म्हणून भाजप जिंकते हे म्हणणे चुकीचे आहे. गडबड त्या मशिनमध्ये नाही तर तुमच्या डोक्यात आहे. मतविभाजन आणि मतदानाला न जाणे अशा दोन्ही गोष्टींमुळे भाजपचे फावते, असेही पटोले यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेना (उबाठा) सुरेंद्रसिंह चंदेल, काँग्रेसचे जेसा मोटवानी, अमोल मारकवार, अॅड.संजय गुरू, श्याम धाईत, वामनराव सावसाकडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोंढाळ्यातील सभेनंतर नाना पटोले यांनी गडचिरोलीतील काँग्रेसच्या प्रचार कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.