गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदललेल्या समीकरणानंतर बुधवारी गडचिरोलीत झालेल्या मेळाव्यात नवीन संभाव्य पदाधिकाऱ्यांची चाचपणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मेळाव्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पक्षाच्या जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत नव्याने पक्ष बांधणीचे संकेत दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष किंवा कोणत्याही नवीन पदाधिकाऱ्याच्या नावाची घोषणा त्यांनी केली नसली तरी प्रदेशाध्यक्षांना अहवाल देऊन आठवडाभरात नवीन जिल्हाध्यक्षाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याला जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्र वैद्य, पक्षाचे माजी पदाधिकारी आणि चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारवार, शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, माजी जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, सुरेश नैताम, राजाभाऊ आत्राम, अॅड.संजय ठाकरे, सुरेश परसोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अनिल देशमुख यांनी भाजपच्या रणनितीवर टिका करत ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. 83 वर्षांच्या बापाला सोडून कोणी जाते का? असा प्रश्न करत जुन्या पदाधिकाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. गेले ते जाऊ द्या, पण आता पक्षाला नव्या जोमाने उभारी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्याची वेळ दुपारची असल्यामुळे दुपारी 12 पासून कार्यकर्त्यांची मेळाव्याच्या ठिकाणी वर्दळ सुरू झाली होती. अनेक वाहनांनी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अभिनव लॅानचे सभागृह भरून गेले होते. आ.देशमुख हे वर्धा येथील कार्यक्रम आटोपून येणार असल्यामुळे त्यांना येण्यासाठी संध्याकाळचे ७ वाजले. रात्री 9.30 वाजता या मेळाव्याची सांगता झाली. त्यानंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अतुल गण्यारपवार, की अजय कंकडालवार?
बुधवारच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना आणण्यापासून तर मेळाव्याची तयारी करण्यापर्यंतचा तामझाम करण्यात अतुल गण्यारपवार आघाडीवर होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण गडचिरोली भागात आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रभाव पाडणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचेही नाव चर्चेत आहे. माजी आमदार दीपक आत्राम हे भारत राष्ट्र समितीत गेल्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेल्या कंकडालवार यांना संधी दिल्यास अहेरी मतदार संघात धर्मराबाबा आत्राम यांच्या गटाला शह देता येईल, यावर राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा झाली. कंकडालवार यांना याबद्दल विचारणाही झाली, पण त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.