गडचिरोली : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून आ.धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याबाबत संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही लोकसभा भाजपाकडून खेचून आणण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन भिसी येथे झालेल्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्याची आढावा बैठक माजी राज्यमंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली भिसी येथे झाली. या बैठकीला असलेली भरगच्च उपस्थिती पाहून पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला होता. या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अरविंद रेवतकर, राजू मुरकुटे यांनी केले होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, गडचिरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, श्रीनिवास शेरकी, अविशा रोकडे, प्रशांत घुमे, लीलाधर भरडकर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सातपुते, प्रियंका बहादूरे, मनीष वजरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत धर्मरावबाबा यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चिमूर तालुक्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
































