जिल्हा मजूर सहकारी संघातील कामे वाटपाची चौकशी होणार

सहकार मंत्र्यांचे निर्देश, तालुकानिहाय मजूर संस्था निर्माण करण्याचीही सूचना

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४२ मजूर सहकारी संस्था असताना केवळ १८ संस्थांनाच कामे दिल्या जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार व अनियमितता असल्याचा आरोप करीत जिल्हा मजूर सहकारी संघाला बरखास्त करण्याची मागणी आमदार डॅा.देवराव होळी यांनी केली होती. त्यावर या कामे वाटपाची चौकशी करण्याचे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.
सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत यासंदर्भात बैठक झाली. यावेळी आ.डॅा.होळी, आ.कृष्णा गजबे यांच्यासह सहकार आयुक्त, गडचिरोली जिल्हा उपनिबंधक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॅा.होळी यांच्या मुद्द्यांवर तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा, तसेच गडचिरोली जिल्ह्यात तालुकानिहाय संख्येच्या प्रमाणात नव्याने मजूर सहकारी संस्थांची निर्मिती करावी, असे निर्देश मंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.