गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कामाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे गुरूवारी संध्याकाळी गडचिरोलीत आगमन होताच सर्किट हाऊसमध्ये गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. आपण महायुतीसोबत असून महायुतीत राहूनच विधानसभा निवडणूक लढणार आहोत. पण भविष्य़ात वेळप्रसंगी स्वबळावर लढावे लागल्यास त्याचीही तयारी ठेवा, असा संदेश या बैठकीत ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी ईच्छुक उमेदवारांसह सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
या भरगच्च बैठकांना तनुश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, जि.प.चे माजी सभापती नाना नाकाडे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, युनूस शेख, दिवाकर निकोरे (ब्रम्हपुरी), संजय चरडुके, रिंकू पापळकर, प्रा.एस.एन.पठाण यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि विधानसभेचे ईच्छुक उमेदवार उपस्थित होते.
सुरूवातीला गडचिरोली जिल्ह्यातील आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विधानसभानिहाय आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून द्या, अशी सूचना केली. निवडणुकीच्या बाबतीत आपले नेते अजितदादा पवार जो आदेश देतील, तो आपण पाळायचा असल्याचे ना.आत्राम म्हणाले.