गडचिरोली : लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात, म्हणजे दि.19 एप्रिल रोजी गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. त्यानंतर तब्बल सव्वा महिन्यानंतर, अर्थात येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत होणार असलेल्या या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर अशा सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता 14 टेबल याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 84 टेबल लावण्यात आले आहेत. याशिवाय टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीसाठी 12 टेबल व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यात आलेल्या पोस्टल बॅलेट सिस्टम (ईटीपीबीएस)साठी एक टेबल अशा एकूण 97 टेबलवर मतमोजणी होणार आहे.
सर्वाधिक 26 फेऱ्या गडचिरोली विधानसभेत
आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्या, आरमोरी मतदारसंघात 22 फेऱ्या, गडचिरोलीकरीता 26 फेऱ्या, अहेरीकरीता 21 फेऱ्या, ब्रम्हपुरीकरिता 23 फेऱ्या आणि चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्या राहणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून सोडत पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.
मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय व प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. त्यात एकूण 117 मतमोजणी पर्यवेक्षक, 130 मतमोजणी सहायक, 120 सुक्ष्म निरीक्षक व इतर 101 सहायक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
उमेदवारांचे प्रतिनिधी, पत्रकारांसाठी विशेष कक्ष
प्रत्येक उमेदवाराला इव्हीएम मतमोजणी, इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे 97 प्रतिनिधी नेमता येणार आहेत. त्यासाठी फॉर्म 18 भरणे आवश्यक आहे. मतमोजणी कक्षात प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीस्थळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकरिता कॅाम्युनिकेशन कक्ष, पत्रकारांसाठी मीडिया कक्ष तसेच उमेदवारांकरिता वेगळा कक्ष राहणार आहे. सर्व कक्ष सुसज्ज आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.
वीज पुरवठा अखंड सुरु राहावा यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले दोन निवडणूक निरीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे. मतमोजणीस्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेची देखरेख आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु, तसेच निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेल्या वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.