सिरोंचा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या 17 मे रोजी काढण्यात येणाऱ्या ‘सिंदूर तिरंगा यात्रे’च्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते होते.

या बैठकीत बोलताना मा.खा.डॉ. नेते म्हणाले, ही यात्रा केवळ राजकीय उपक्रम नसून देशभक्ती जागवणारी आणि सैनिकांच्या त्यागाला सलाम करणारा, राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने यात मनापासून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या यशस्वी मोहिमांमुळे भारताचा सन्मान जागतिक स्तरावर वाढला आहे. त्यामुळे आपणही देशासाठी कार्यरत सैनिकांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सलाम करत ही यात्रा मोठ्या उत्साहाने यशस्वी करूया, असे ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ठरल्याप्रमाणे प्रत्येक मंडळस्तरावर ही यात्रा प्रभावीपणे राबवायची असल्याचे डॅा.नेते म्हणाले.
यावेळी सिरोंचा तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, डॉ.अशोक नेते यांनी भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी तालुका कार्यकारिणीची निवड करण्याचे निर्देश त्यांना दिले.
या बैठकीला भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, विनोद आकनपल्लीवार, कृ.उ.बा.स.सभापती सतीश गंजीवार, गजानन कालेशेपवार, देवेंद्र रनगू, युवा नेते शारिक शेख, श्यामसुंदर मेचनेनी, अशोक शामला, कार्तिक पलकोटा, विजय कलशेपवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.