गडचिरोली : श्रावणबाळ निराधार, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार व विधवा परित्यक्त्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य गेल्या 6 महिन्यांपासून वेळेवर देण्यात आलेले नाही. ते तातडीने देण्यात यावे, हजारो पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यात यावा, यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवारी गडचिरोलीच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शासन असंवेदनशीलपणे काम करत असून हा अन्याय दूर करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्षांच्या वतीने संपूर्ण राज्यभरात निराधारांच्या न्यायासाठी चळवळ उभी करणार, असा इशारा यावेळी शेकापचे नेते रामदास जराते यांनी दिला.

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक 5 हजार रुपये पेंशन देण्यात यावे यासह रोजगार हमी योजनेची मजुरी वेळेवर देण्यात यावी, शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान तातडीने द्यावे, धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, गडचिरोली शहरातील संघर्षनगर, इंदिरानगर, शाहूनगर, गोकूळनगर, विवेकानंदनगर, विसापूर भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना घराचे कायमस्वरूपी पट्टे देवून नगरपरिषदेतर्फे घरकुल योजनेचा लाभ द्यावा, या आणि अशा विविध मागण्यांचा यात समावेश होता.
या आंदोलनात भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, जिल्हा समितीचे सदस्य गुरूदास सेमस्कर, भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, चंद्रकांत भोयर प्रामुख्याने सहभागी झाले होते.
सदर ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येवून नायब तहसीलदार हलमारे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी शेकापचे पदाधिकारी योगाजी चापले, देवेंद्र भोयर, भास्कर ठाकरे, विलास भोयर, महागू पिपरे, छाया भोयर, रजनी खैरे, संगीता चांदेकर, आझादचे पदाधिकारी सतीश दुर्गमवार यांच्यासह निराधार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.