संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तींसोबत उभे रहा, रिपब्लिकन पक्षाचे आवाहन

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा

गडचिरोली : आज देशाचे संविधान, लोकशाही व धर्मनिरपेक्ष स्वरूप धोक्यात आले आहे. ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे, असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केले.

पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदेकर भवन येथे शनिवारी झाली, त्यावेळी हे आवाहन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, केशवराव सामृतवर, गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, आरमोरी विधानसभा प्रमुख कृष्णा चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

या सभेत देशातील सध्याची परिस्थिती आणि जिल्ह्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तथा अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार होत आहेत. बेरोजगारी, महागाईसोबतच शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न जटील झाले आहेत, परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष पद्धतीने लढविण्यासाठी ईव्हीएम त्वरित बंद करण्यात याव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या सभेला साईनाथ गोडबोले, दादाजी धाकडे, अरुण भैसारे, हेमाजी सहारे, कविता वैद्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.