देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम व बौद्ध समाज कोंढाळा यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सामाजिक भवन व बुद्धमूर्तीचे लोकार्पण, तसेच सिमेंट काँक्रिट रोड, बुद्ध विहाराचे बांधकाम, तसेच दलित सुधार योजनेअंतर्गत बुद्ध विहार ते राष्ट्रपाल शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी खासदार नेते म्हणाले, या कोंढाळा गावी तथागत भगवान बुद्धांची एक चांगली मूर्ती शांततामय वातावरणात बसविण्यात आली. या ठिकाणी सामाजिक सभागृहाचे (सभामंडप) लोकार्पण, तसेच रस्ते बांधकामाचे माझ्या हस्ते भूमिपूजन झाले ही एक आनंददायी बाब आहे. याबरोबरच लहान मुले-मुलींनी या बुद्ध विहाराच्या भितींवर कुठेही खडूने खोडतोड न करता या सामाजिक सभागृहाला चांगले ठेवून त्याचा लाभ घ्यावा. तथागत भगवान बुद्ध यांचे विचार व बाबासाहेबांचे संविधानिक विचार आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी या उद्घाटन सोहळ्यात बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यवान खोब्रागडे होते. यावेळी लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, विद्या कृष्णाजी गजबे, माजी महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, आशिष पिपरे, पंढरी नखाते, वसंत दोनाडकर, प्रमोद झिलपे, रमेश अधिकारी, शंकर पारधी, कैलास राणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विहारासाठी जागा दान करणाऱ्या मंडळींचा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत मंडपे यांनी, तर प्रास्ताविक राजेंद्र शेंडे व आभार बौद्ध समाज कोंढाळाचे अध्यक्ष नागोराव उके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज कोंढाळा येथील सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांनी सहकार्य केले.