‘बीआरएसपी’त अंतर्गत कलह शिगेला, अनेक पदाधिकाऱ्यांचे ‘ना’राजीनामे !

अधिकृतपेक्षा बंडखोर उमेदवार वरचढ

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या (बीआरएसपी) अधिकृत उमेदवार निवडण्यावरून सुरू झालेल्या नाराजीनंतर जिल्ह्यात उभी फूट पडली आहे. अधिकृत उमेदवार बारीकराव मडावी यांच्यापेक्षा पक्षाचे बंडखोर उमेदवार विनोद मडावी यांना जास्त मते पडली आहेत. यानंतरही पक्षाकडून उमेदवार निवडीत झालेली चूक मान्य केल्या जात नसल्याने अखेर अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन राजीनामे दिले आहेत.

बीआरएसपीचे उमेदवार बारीकराव मडावी योग्य नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ता म्हणून अपक्ष उमेदवार विनोद मडावी यांच्या बाजूने प्रचारात उभे राहिले. दरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत केवळ पक्षाचे प्रभारी राज बन्सोड यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. निवडणुकीत बीआरएसपीचे उमेदवार बारीकराव मडावी यांना 2555 मते, तर बंडखोर उमेदवार विनोद मडावी यांना 6127 मते पडली. निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांकडून बन्सोड यांच्यावरील कारवाई रद्द होईल या अपेक्षेत सर्व पदाधिकारी होते. परंतु तसे कोणतेही संकेत न दिसल्याने राज बन्सोड यांच्या समर्थनात नाराज पदाधिकाऱ्यांनी सामूहिक पत्राद्वारे राजीनामा देऊन लवकरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.

सामूहिक राजीनामापत्रावर सह्या करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा सचिव जितेंद्र बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन वैद्य, आरमोरी विधानसभा अध्यक्ष सचिन गेडाम, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रितेश अंबादे, गडचिरोली तालुकाध्यक्ष तामस शेडमाके, तालुका सचिव प्रणय दरडे, तालुका उपाध्यक्ष गोकुळ ढवळे, गडचिरोली शहराध्यक्ष प्रतीक डांगे, शहर सचिव नागसेन खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रफुल रायपुरे, जिल्हा सचिव संघरक्षित बांबोळे, आरमोरी अध्यक्ष पियुष वाकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तारका भडके, जिल्हा सचिव शोभा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष विभा उमरे, करुणा खोब्रागडे, तालुकाध्यक्ष सविता बांबोळे, तालुका उपाध्यक्ष पौर्णिमा मेश्राम, शहर सचिव प्रतिमा करमे, शहर कोषाध्यक्ष सोनाक्षी लभाने तथा विद्यार्थी मोर्चाचे कमलेश रामटेके इत्यादींचा समावेश आहे.

जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांच्या नेतृत्वात काम करून आम्ही पक्ष वाढविला, पण त्यांचे निलंबन परत घेण्यासंदर्भात विनंती करूनही कोणताही निर्णय वरिष्ठांकडून न आल्याने आम्ही राजीनामे देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटले आहे.