अहेरीतील काँग्रेसच्या सत्कार सोहळ्यात आघाडीतील घटक पक्षांना डावलले

विजयानंतर विसर पडल्याची भावना

अहेरी : लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान यांचा शनिवारी (दि.22) जाहीर सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्यांचे जंगी स्वागतही झाले. पण हा विजयाचा आनंद साजरा करताना प्रचारकाळात नेहमी सोबत राहणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विसर पडल्याचा सूर त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आळवला. मात्र त्यांनी नाराज न होता स्वतंत्रपणे सत्कार सोहळा घ्यावा, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सूचवले. त्यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय झाला आहे.

काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, आतिषबाजी करत जंगी स्वागत केले. विजयोत्सव रॅलीही काढण्यात आली.

अहेरीच्या गांधी चौकात आविसं तथा काँग्रेसचे नेते, माजी जि.प.अध्यक्ष आणि अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार केला. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला, असे वडेट्टीवार म्हणाले.