गडचिरोली : मतदानासाठी ईव्हीएमचा वापर न करता मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे, यासाठी सुरू झालेल्या लढ्यात आता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीही उतरली आहे. या मागणीसाठी 5 ते 10 डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी सह्यांची मोहीम राबवून एक ते दिड लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ब्राम्हणवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मताधिक्य होते. विशेषत: गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात मोठ्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा विजय होईल अशी खात्री होती. पण आरमोरीत अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, तर गडचिरोलीत भाजपचे वाढलेले मताधिक्य संशयास्पद आहे, असे सांगत आजही मतपत्रिकेवर निवडणूक झाल्यास काँग्रेसचा विजय होईल, असा दावा त्यांनी केला.
चामोर्शी तालुक्यातील बंगालीबहुल भागात किमान 50 टक्के मतं काँग्रेसला मिळतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नसल्याबद्दल काँग्रेसचे पराभूत उमेदवार मनोहर पोरेटी यांनी आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी आरमोरीचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शंकरराव सालोटकर, अब्दुल पंजवानी, प्रभाकर वासेकर, अनिल कोठारे, सुनील चडगुलवार, राजेश ठाकूर, रमेश चौधरी, नंदू वाईलकर, उत्तम ठाकरे, दत्तात्रय खरवडे, सुरेश भांडेकर, जितेंद्र मुनघाटे, कल्पना नंदेश्वर, हेमंत मोहीतकर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.