अहेरी : लग्न करण्याचे आमिष दाखवत एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे वारंवार लैंगिक केले. त्यानंतर तिचा गर्भपात करताना प्रकृती बिघडून तिचा मृत्यूही झाला. प्रकरणी आरोपीला आणि त्याच्या मावशीला दोषी ठरवत अहेरीचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. एन. बावनकर यांनी मुख्य आरोपीला 7 वर्ष, तर त्याच्या मावशीला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी अनिल नानाजी ईजगामकर (34 वर्ष), रा.आलापल्ली याने नागेपल्ली येथील माडिया जमातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती अल्पवयीन युवती गर्भवती झाली. त्यामुळे आरोपी अनिल याने आपली मावशी चंद्रकला सुरेश धानोरकर (47 वर्ष) रा.अनखोडा, ता.चामोर्शी हिच्या मदतीने पीडित मुलीला गर्भपाताचे औषध पाजले. त्यामुळे तिचा गर्भपात तर झाला, पण पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. एवढेच नाही तर उपचारादरम्यान तिचा मृत्यूही झाला. त्यामुळे आरोपी अनिल याच्याविरोधात अहेरी पोलिसांनी कलम 376, 315, 34 आणि पोक्सो कलमासोबत नंतर कलम 302 हे सुद्धा जोडले.
पीडित मुलीने आरोपीविरूद्ध मृत्यूपूर्व बयान दिल्याने तसेच सबळ पुरावा मिळून आल्याने अहेरी पोलिसांनी दोषारोपपत्र तयार करून हे प्रकरण सत्र न्यायालयात दाखल केले.
अहेरी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.एन.बावणकर यांनी साक्षीदारांचे बयान, वैद्यकीय अभिप्रायाचे पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून दि.3 डिसेंबर रोजी आरोपी अनिल ईजगामकर याला 7 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, तसेच आरोपीची मावशी चंद्रकला सुरेश धानोरकर हिला कलम 315 अन्वये 4 वर्ष कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील निळकंठ भांडेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी केला.