आदिवासी विकासमंत्री उईके यांनी विद्यार्थिनींसोबत बसून घेतले जेवण

आवश्यक निधी उपलब्ध करणार

अहेरी : सर्वांगीण विकासातून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी दिले. अहेरी येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित आदिवासी लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यादरम्यान अहेरीतील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींसोबत खाली बसून जेवणाचा आस्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधला.

या मेळाव्यास आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, आदिवासी विकास मंडळाचे महाव्यवस्थापक किरण गाडे, तसेच माजी राज्यमंत्री अंबरिशराव आत्राम, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्री अशोक उईके यांनी पुढे सांगितले की, आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योजनांबद्दल लाभार्थ्यांना समजावून सांगून त्यांच्या सूचना ऐकून घ्याव्यात आणि त्या अंमलात आणाव्यात, असे निर्देश त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पात्र व गुणवत्ताधारक शिक्षक नेमले जातील, तसेच प्रत्येक आदिवासी शाळेत बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. स्वच्छतेसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि प्रत्येक शाळेची स्वच्छता सुनिश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.