अरसोडाच्या जंगलात सापडला बालकासह अर्धवट जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह

अंगात टी-शर्ट, स्मार्ट वॅाच !

मृतदेहाजवळून पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तू

आरमोरी : आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अरसोडाच्या जंगलात अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेतील व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाच्या डाव्या पायाजवळ आणि उजव्या हातात लहान बालकाचाही पंजा आढळला आहे. त्यामुळे माय-लेक किंवा बाप-लेकाला मारून मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ही व्यक्ती कोण आणि त्यांचा मृतदेह या जंगलात कसा आला, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार, जळालेली व्यक्ती अंदाजे 25 वर्षाच्या वयातील असावी. त्या व्यक्तीच्या अंगात अर्धवट जळालेला आकाशी रंगाचा टी-शर्ट, मेंदी कलरचा गमचा, लेटर पॅडचे हुक तसेच जळालेली स्मार्ट वॅाचही आढळली. त्यामुळे हा मृतदेह कोणत्या सुशिक्षित व्यक्तीचा असण्याची शक्यता आहे. मात्र ती व्यक्ती पुरूष की महिला हे स्पष्ट झालेले नाही.

अरसोडा येथील सुरज दिघोरे हे कुड्याची फुले तोडण्यासाठी गेले असताना त्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरमोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या घटनेचा शोध सुरू केला आहे.

जवळपास 15 दिवसांपूर्वी सदर मृतदेहाला या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न झाला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कोणी व्यक्ती, बालक गायब आहे का, याची माहिती घेणे सुरू केले आहे.