गडचिरोली : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल गडचिरोलीचे सुपूत्र विजय वडेट्टीवार यांचे गडचिरोलीत जोरदार स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी गडचिरोलीतील आठवणींना उजाळा दिला. सोबत आपल्या राजकीय प्रवासातील चढत्या आलेखामागील रहस्य सांगितले.
रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास ना.वडेट्टीवार यांचे आगमन होताच आरमोरी मार्गावर त्यांचे आतिषपबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या खुल्या जीपवरून मुख्य मार्गाने त्यांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या प्रांगणात जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ना.वडेट्टीवार यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला दिला. मी विशिष्ट विचारांनी प्रेरित असल्यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या उठविलेल्या वावड्या खोट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ.अभिजित वंजारी, आ.सुधाकर अडबाले, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, माजी आ.डॅा.रामकृष्ण मडावी, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी जि.प.अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॅा.नितीन कोडवते, डॅा.चंदा कोडवते, युवती काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शिवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल, भावना वानखेडे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राम मेश्राम यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.