गडचिरोली : प्रत्येक क्षेत्रात महिला समोर येण्यासाठी खऱ्या अर्थाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना उपलब्ध व्हावा, त्यातून त्यांचे सक्षमीकरण शक्य आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील महिला लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.
मौजा कोटगल येथे आयोजित महिला सशक्तिकरण मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. महापुरुषांच्या फोटोंचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंचावर तहसीलदार महेंद्र गणवीर, ना.तहसीलदार आर.तलांडे, ना.तहसीलदार डी. ठाकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, पं.स.विस्तार अधिकारी बेडके, गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले, सरपंच मारोती जेंगठे, उपसरपंच तेजप्रभा भोयर, शहर महामंत्री केशव निंबोड, पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रकाश काळे, तालुका कृषी अधिकारी नेहा पवार, सरपंच तुषार मडावी, घनशयाम कोलते, रिता खोब्रागडे, मिना मेश्राम, तसेच मोठ्या संख्येने गावातील महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.
या अभियानांतर्गत महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विविध सरकारी योजनांचे स्टॉल, बचत गटांची नोंदणी, शक्ती गटांची महिला बचत गटांची जोडणी, महिलांना वैयक्तिक उद्योग व व्यावसायिक प्रशिक्षण, घरगुती तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करणे अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना सशक्तिकरण मेळाव्यातून सक्षम करणे गरजेचे आहे, असे यावेळी खासदार अशोक नेते म्हणाले. याप्रसंगी विविध योजनांचे स्टॉल व विविध योजनांची पत्रके वितरित करण्यात आली.